पुणे : देशभरातील बँक ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2026 या तीन दिवसांच्या काळात देशव्यापी संप पुकारला आहे. या संपामुळे सरकारी बँका तसेच ग्रामीण बँकांच्या शाखांमधील दैनंदिन कामाकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ग्राहकांची बँकेत प्रत्यक्ष जाऊन करावी लागणारी कामे या काळात खोळंबू शकतात. यामध्ये काउंटरवरून रोख रक्कम काढणे किंवा भरणे, चेक वटवणे, KYC अपडेट करणे आणि कागदपत्रे जमा करणे यासारख्या सेवांचा समावेश आहे. त्यामुळे शाखेशी संबंधित कोणतीही महत्त्वाची कामे असल्यास ती 28 सप्टेंबरपूर्वीच पूर्ण करून घेणे हिताचे ठरेल.

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे UPI, नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग पूर्णपणे बंद राहील असा गैरसमज करून घेऊ नये. या सर्व ऑनलाईन सुविधा नियमितपणे सुरू राहतील. नागरिक UPI द्वारे पैसे पाठवणे, QR कोड स्कॅन करून पेमेंट करणे आणि बिल भरणे या गोष्टी सहज करू शकतील.

मात्र, अचानक सर्व्हर डाऊन होणे किंवा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास डिजिटल पेमेंटमध्ये अडथळा येऊ शकतो. यासाठी ऐनवेळी त्रास होऊ नये म्हणून लागणारे महत्त्वाचे व्यवहार वेळेतच उरकून घ्यावेत.
संपाच्या काळात ATM मशीन सुरू राहतील, तरीही रोख रकमेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सलग तीन दिवस बँका बंद असल्याने अनेक ATM मधील कॅश संपू शकते. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकतेनुसार आधीच काही रोकड जवळ बाळगणे फायदेशीर ठरेल.






