पुणे : महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर विरोधी पक्षांनी कडाडून टीका केली आहे. या संदर्भात बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी, सरकारने जाहीर केलेला जीआर म्हणजे शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारसमोर मागण्या मांडल्या आहेत.शेतकऱ्यांचे हातचे पीक गेल्यामुळे त्यांचा वर्षभराचा खर्च निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे सरकारने अडीच हेक्टरची अट रद्द करून शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत द्यावी.तसेच कर्जाचे पुनर्गठन केल्यास शेतकरी पुन्हा कर्जाच्या बोझ्याखाली दबला जाईल. त्यामुळे सर्व जाचक अटी आणि शर्ती हटवून पीककर्ज पूर्णपणे माफ केले पाहिजे.

सहकार मंत्री पंचनामे आणि मदतीसाठी वेळ लागणार असल्याचे सांगतात. मंत्री स्वतः काजू-बदाम खातात, पण संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला तातडीने मदत न देता त्याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहेत., 5ऑक्टोबरचा पंचनाम्यांचा मुहूर्त कशासाठी शोधला जात आहे, असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातही पाऊस अतिशय कमी झाला आहे. त्यामुळे या तालुक्याचा समावेश तातडीने दुष्काळी यादीत करण्यात यावा.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांनीही या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारचा हा जीआर आणि जाहीर केलेल्या उपाययोजना पूर्णपणे कोरड्या ठाक आहेत, असे ते म्हणाले. 265 तालुक्यांमध्ये पहिला ट्रिगर लागू करण्यात आला असला, तरी हा निर्णय किमान 3 आठवडे आधीच घ्यायला हवा होता, असे मत रोहित पवार यांनी मांडले.
केवळ दुष्काळ जाहीर करून कागदी घोडे नाचवण्यापेक्षा सरकारने कोणतीही दिरंगाई न करता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आणि तातडीने आर्थिक मदत जमा करावी, अशी आक्रमक मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.






