सागर जगदाळे
भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावरील भिगवण (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीतील सेवा रस्त्यावरील तुटलेल्या गटारांची दुरुस्ती करण्यास पाटस रस्ते महामार्ग विकास प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पुणे-सोलापूर महामार्गाच्या लगत असणाऱ्या गटारांची दुरवस्था झाली होती. महामार्गालगत असणाऱ्या गटारांवरील बरीचशी झाकणांची मोडतोड झालेली होती. त्यामुळे या गटारांमध्ये अडकलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांसह इतर घाणीमुळे गटारे तुंबली होती. दुर्गंधीयुक्त पाणी गटारांमधून महामार्गलगतच्या सेवा रस्त्यांवरून वाहत होते. त्यामुळे महामार्गलगत राहात असणाऱ्या नागरिकांना व दुकानदारांना या दुर्गंधी पाण्याचा त्रास होऊ लागला होता.
यामुळे भिगवण मराठा महासंघ व मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष अॅड. पांडुरंग जगताप यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महामार्ग विकास प्राधिकरणला दिला होता. त्याची दखल घेऊन रस्ते महामार्ग विकास प्राधिकरण पाटस यांच्या वतीने दखल घेऊन महामार्गलगत तुंबलेल्या गटारांची साफसफाई करून तोडफोड झालेली झाकणे बदलून त्याऐवजी नवीन झाकणे टाकण्यात सुरुवात केली आहे.
दरम्यान, महामार्गलगत तुंबलेल्या गटारांची वेळेत दुरुस्ती केल्यामुळे भिगवण मधील नागरिकांना होणाऱ्या असह्य त्रासातून दिलासा दिल्याबद्दल भिगवणकरांनी पाटस येथील महामार्ग विकास प्राधिकरणाचे आभार मानले आहेत.