पुणे : भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांनी थकीत वेतन आणि विविध थकित देणी मिळावी यासाठी मागील ३२ दिवसांपासून भीमा पाटस कारखान्याच्या गेटसमोर कामगार आक्रोश आंदोलन व चक्री उपोषण सुरू आहे. ३२ दिवसानंतरही कारखाना प्रशासनाकडून तोडगा निघाला नसल्याने आज ऐन दिवाळीत कामगारांनी भाजी भाकरी खात काळी दिवाळी साजरी केली. यावेळी आंदोलनात कामगारांच्या महिलाही सहभागी झालेल्या असून त्यांनी व्यक्त केलेल्या भावना ह्या जीवाला चटका लावून जात आहेत.
भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांचे सन २०१५ पासून थकीत पगार, वेतन वाढ पगार फरक, ग्रॅच्युइटीची रक्कम, रजेचा पगार, बोनस, प्रॉव्हिडंट फंड भरणा न केलेला, पगारातून कपात केलेली कामगारांची पतपेढीची कर्ज वसुली व हप्ते वसुली, पगारातून इन्शुरन्स हप्ता वसूल केलेली रक्कम व इतर अनेक देणी रक्कम भीमा पाटस कारखान्याकडे थकीत आहे. ही थकीत देणी मिळावी यासाठी जवळपास साडेचारशे सेवानिवृत्त कामगारांनी २ ऑक्टोबरपासून आक्रोश आंदोलन व चक्री उपोषण सुरू केले आहे. गेल्या ३१ दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून दिवाळी उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत कामगारांचे कुटुंबीय मात्र दिवाळी पासून दूरच राहिले आहेत.
भीमा पाटस कारखान्याच्या सप्टेंबर महिन्यात सर्वसाधारण सभेत कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांनी पंधरा दिवसात कामगारांची थकीत देणी देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र पंधरा दिवस होऊनही कारखान्याच्या संचालक मंडळाने कामगारांचे थकीत देणी दिली नाहीत. कारखान्याच्या व्यवस्थापनावर आमचा विश्वास नसून ते लबाड असल्याचा आरोप कामगार करत आहे. महात्मा गांधी यांच्या जयंती २ ऑक्टोबरपासून कामगारांनी साखळी उपोषण सुरू केले असून या आंदोलनाला ३२ दिवस होऊनही ठोस निर्णय घेतला नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
यावेळी कामगार नेते शिवाजी काळे म्हणाले की ५०० कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. यापैकी चाळीस कामगारांचे निधन झालेले आहे. आमची पन्नास कोटी विविध स्वरूपाची देणी कारखान्याकडे आहे. वारंवार मागणी करूनही आमची दिली जात नाही. सध्या आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. कारखान्याच्या संचालक मंडळांने आमची देणी न दिल्यास तीव्र उपोषण करु असा इशारा यावेळी काळे यांनी दिला. ३१ दिवसानंतरही तोडगा निघाल्याने यंदाची दिवाळी कारखाना गेट समोर काळ्याफिती लावून भाजी-भाकरी खात केली दिवाळीचा सणासुदीला काही रक्कम आपल्याला मिळावी आणि दिवाळी गोड व्हावी अशा स्वरूपाची अपेक्षा सेवा सेवानिवृत्त कामगारांना होती.
मात्र त्यांची उपेक्षा झाली. कष्टाचे आणि घामाचे पैसे सेवानिवृत्ती नंतरही मिळाले नसल्याने सेवानिवृत्त वयोवृद्ध जवळपास ३०० अधिक कामगार साखर कारखाना चेअरमन विद्यमान आमदार राहुल कुल आणि संचालक मंडळाच्या विरोधामध्ये अगदी त्रस्त होऊन गेट समोर चक्री उपोषण करीत आहे. एका बाजूला विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असून दौंड विधानसभा मतदारसंघात सेवानिवृत्त कामगारांचा प्रश्न महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. एकीकडे प्रचाराच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना मेजवानी दिली जाईल परंतु सेवानिवृत्त कामगार मात्र दिवाळीच्या काळातही आज ३२ दिवस वयोवृद्धांच्या घामाचे आणि कष्टाचे राहिलेले पैसे मिळतील म्हणून अशावादी आहोत. ही दिवाळी आमच्यासाठी गोड होण्याची शक्यता नाही. गेले आठ वर्ष आमच्या प्रश्नाना भूल थापा देत आहेत. पंधरा दिवसात देणी देतो असे कारखान्याचे चेअरमन व आमदार राहुल कुल यांनी सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर भाषणातून केलेले वक्तव्य ते आता विसरून गेलेले आहेत.