लोणी काळभोर, (पुणे) : हवेली तालुक्यातील थेऊर, नायगाव आणि हिंगणगाव (AG) कृषी फिडर अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांना पूर्वीप्रमाणेच दिवसा वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता देविदास बैकर आणि आमदार ज्ञानेश्वर कटके यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनानुसार, सध्या थेऊर, नायगाव आणि हिंगणगाव फिडरअंतर्गत येणाऱ्या गावांमधील शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेत वीजपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे पिकांना पाणी (सिंचन) देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतात जावे लागत असून मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.

रात्रीच्या अंधारात शेतात जाऊन विहिरीवरील मोटारी सुरू करणे, पाणी व्यवस्थापन करणे यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, सध्या या संपूर्ण भागात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांवर बिबट्यांच्या हल्ल्याची दाट भीती निर्माण झाली आहे. बिबट्यांसोबतच साप व इतर विषारी श्वापदांचा सामनाही शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
यापूर्वी या भागातील गावांना दिवसा वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे आणि सिंचनाचे नियोजन सुलभपणे करता येत होते. सध्या मान्सूनपूर्व आणि खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात असून शेतांची मशागत व पेरण्यांचे नियोजन सुरू आहे. अशा महत्त्वाच्या काळात शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा होणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, असेही काकडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, थेऊर, नायगाव व हिंगणगाव AG फिडर अखत्यारीतील सर्व गावांना पूर्वीप्रमाणे दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी, महावितरण प्रशासनाने तातडीने आवश्यकती कार्यवाही करावी, अशी मागणी सभापती युवराज काकडे यांनी केली आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर महावितरण यावर काय निर्णय घेणार, याकडे आता संपूर्ण हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.







