पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका विद्यार्थ्याच्या नावाने बनावट बी.कॉम. गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र तयार करून त्याबदल्यात 70 हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी विद्यापीठातील कर्मचारी रमेश दामोदर मुखेकर (वय 48) याला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 4 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

विद्यापीठाने सादर केलेल्या कागदपत्रांची अधिकृत नोंदींशी पडताळणी केल्यानंतर संबंधित गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र प्रथमदर्शनी पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. प्रमाणपत्रावरील पदवी क्रमांक तपासला असता तो दुसऱ्याच विद्यार्थ्याच्या नावावर असल्याचे आढळून आले. तसेच ज्या विद्यार्थ्याच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली होती, त्याच्या शैक्षणिक नोंदींमध्येही त्याचा कोणताही मेळ आढळला नाही.

तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. बनावट पदवी प्रमाणपत्रावर एप्रिल 2024 ची तारीख नमूद असली, तरी त्यावर माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या स्वाक्षरीचा वापर करण्यात आला होता. डॉ. गाडे यांनी 2013 ते 2018 या कालावधीत कुलगुरूपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यामुळे हे प्रमाणपत्र बनावट असल्याचा संशय अधिक बळावला.

या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपी विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागातील कर्मचारी असून परीक्षा विभागात कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. त्याने विद्यार्थ्याच्या वडिलांना मुलगा बी.कॉम. उत्तीर्ण झाल्याचा विश्वास देत बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र दिले. त्याबदल्यात यूपीआयद्वारे 70 हजार रुपये स्वीकारल्याचे तपासात समोर आले आहे.
आरोपीने बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला, अशा प्रकारे आणखी किती विद्यार्थ्यांची कागदपत्रे बनवली, ऑनलाइन मिळालेल्या पैशांचा वापर कशासाठी केला आणि त्याचा यापूर्वी अशा गुन्ह्यांशी संबंध आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. तसेच आरोपीच्या मोबाईलमधील माहितीही तपासली जाणार आहे.







