पुणे: राज्यातील अनेक भागांत पावसाची उघडीप कायम असून, काही ठिकाणी हलक्या सरी तर काही भागांत ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. 28 ऑगस्ट रोजीही राज्यात बहुतांश ठिकाणी अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

कोकण आणि घाटमाथ्याच्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही 28 ऑगस्टला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज आहे.

धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिकच्या घाट परिसरात मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. अहिल्यानगरमध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे. या भागासाठी कोणताही पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.
पुणे जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता असून, पुण्याच्या घाट परिसरात मध्यम पाऊस होऊ शकतो. कोल्हापूर, सातारा आणि सांगली परिसरात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मध्यम पावसाची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि धाराशिवमध्ये हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी पडण्याची शक्यता आहे. हिंगोली, नांदेड आणि लातूरमध्येही मेघगर्जनेसह हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे.
अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी 28 ऑगस्ट रोजी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे विदर्भात प्रामुख्याने कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी पडू शकतात.






