पुणे : राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत झालेला गोंधळ आणि त्यानंतर पुण्यात झालेली विद्यार्थ्यांची आंदोलने यांमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. रोहित पवार यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी आयोगाच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेत अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या वाढत्या दबावानंतर शासनाने चौकशी समिती स्थापन केल्याची चर्चा सुरू झाली आणि या समितीच्या सचिवपदी वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची निवड झाल्याचे बोलले गेले.मात्र, या संपूर्ण प्रकरणावर खुद्द तुकाराम मुंढे यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

चौकशी आयोगात किंवा समितीत आपल्या सहभागाबाबत सरकारकडून किंवा प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही, असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.केवळ तोंडी चर्चा झाली असल्याचे सांगत, अधिकृत आदेश किंवा कागदपत्रे अद्याप प्राप्त झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
MPSC परीक्षांमधील सततच्या चुका आणि गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप होता. यावरून पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली आणि आयोगाच्या कारभाराविरुद्ध आवाज उठवला.विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानंतर शासनाने दखल घेऊन चौकशी समिती नेमल्याची माहिती समोर आली होती.

आता तुकाराम मुंढे यांच्या या वक्तव्यानंतर या चौकशी समितीच्या अस्तित्वाबाबत आणि अधिकृत नियुक्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या काळात प्रशासन यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








