पिंपरी-चिंचवड : पिंपळे गुरव परिसरात रस्त्याच्या कडेला कचऱ्यातील पोत्यात पुरुषाचे गुडघ्यापासून वेगळे केलेले दोन पाय आढळल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा सांगवी पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला आहे. अनिल खाडे यांची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचे दोन्ही पाय वेगळे करून पोत्यात भरल्याचा आरोप आहे. या प्रकरणी विष्णू तानाजी कुंभार याला अटक करण्यात आली आहे.

रामकृष्ण मंगल कार्यालय ते काटेपुरम चौकादरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्यात हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कृष्णा लोट आणि ओमकार काळे हे कचरा गोळा करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना एका पोत्यावर रक्ताचे डाग दिसले. सुरुवातीला पोत्यात श्वानाचे पाय असल्याचा संशय त्यांना आला. मात्र, पोते उघडून पाहिल्यानंतर त्यात मानवी पाय असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पोत्याची पाहणी केली असता त्यात सिमकार्डचे कव्हर आढळले. या कव्हरवरील मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. संबंधित क्रमांकाच्या माध्यमातून पोलिसांना मृत अनिल खाडे यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचता आले. त्यानंतर तपासाची दिशा विष्णू कुंभार याच्याकडे वळली.

पोलिसांनी विष्णू कुंभार याच्या घरी जाऊन पाहणी केली असता घराला कुलूप असल्याचे दिसले. आरोपी घराला कुलूप लावून पसार झाला होता. पोलिसांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला असता आतून दुर्गंधी येत होती. घराची झडती घेतली असता अनिल खाडे यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे या प्रकरणातील हत्येचा उलगडा झाला.

पोलिसांच्या तपासानुसार, अनिल खाडे आणि विष्णू कुंभार हे दोघे मित्र होते. घटनेच्या रात्री दोघांनी एकत्र मद्यप्राशन केले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. या वादातून विष्णू कुंभार याने अनिल खाडे यांच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार केला. त्यामुळे ते बेशुद्ध झाले. त्यानंतर आरोपीने कोयत्याने त्यांचे दोन्ही पाय गुडघ्यापासून वेगळे केले, असा आरोप आहे.
हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने दोन्ही पाय पोत्यात भरले आणि रामकृष्ण मंगल कार्यालय ते काटेपुरम चौकादरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्यात फेकून दिले. मात्र, पोत्यात सापडलेल्या सिमकार्डच्या कव्हरमुळे पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला आणि तपासाला दिशा मिळाली.
पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, सहायक पोलीस आयुक्त मनीषा कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.






