यवत, ता. 07 : इलेक्ट्रिकल दुकानांचे कलेक्शन घेऊन पुण्याकडे निघालेल्या कर्मचाऱ्याच्या ‘डोळ्यात मिरची पूड टाकून तब्बल 5 लाख 95 हजार 600 रुपयांची रोकड असलेली सॅक दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी पळवून नेल्याची घटना घडली. पुणे-सोलापूर महामार्गावरील सहजपूर (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील संजीवनी हॉटेलसमोर गुरुवारी (ता. 05) सायंकाळी पाऊणे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी पवन अशोक पाटील (वय-24, रा. शिवणे, ता. हवेली) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात तीन इसमांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन हे पुण्यातील बुधवार पेठेतील पारस इलेक्ट्रिक दुकानात गेल्या पाच वर्षांपासून नोकरीस आहेत. गुरुवारी ते मालकाच्या ज्युपिटर दुचाकीवरून विविध इलेक्ट्रिकल दुकानांचे पैसे जमा करण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांनी हडपसर येथील रॉयल इलेक्ट्रिक दुकानातून 35 हजार 600 रुपये, केडगाव येथील एच.डी. इलेक्ट्रिकल दुकानातून 1 लाख 60 हजार रुपये, यवत येथील माऊली इलेक्ट्रिकल दुकानातून 2 लाख रुपये आणि यवत येथील भुलेश्वर मार्केटमधील संगीत इलेक्ट्रिकल दुकानातून 2 लाख रुपये असे एकूण 5 लाख 95 हजार 600 रुपये जमा केले होते. ही रोकड त्यांनी सॅकमध्ये ठेवून दुचाकीच्या सीटखालील डिकीत ठेवली होती.

सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास ते पुण्याकडे जाण्यासाठी निघाले. सहजपूर गावच्या हद्दीत संजीवनी हॉटेलसमोर पोहोचले असता, पाठीमागून पल्सरसारख्या दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या दुचाकीला कट मारून त्यांना थांबवले. त्यातील एका व्यक्तीने अपघात केल्याचा आरोप करत पोलिसांना फोन करण्याची धमकी दिली. त्यानंतर दुचाकीची चावी काढण्याचा प्रयत्न केला.

याचवेळी दुसऱ्या व्यक्तीने दुचाकीची डिकी उघडण्यास सांगितले. पवन यांनी मागे वळून डिकीकडे पाहताच काळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या व्यक्तीने त्यांच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकली. त्यानंतर तिघांनी जबरदस्तीने डिकी तोडून त्यातील रोकड असलेली सॅक काढून घेतली आणि पुण्याच्या दिशेने पलायन केले.
दरम्यान, घटनेनंतर पवन यांनी आरडाओरडा केला. परिसरातील नागरिक त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी मालकांना व्हिडिओ कॉल करून घटनेची माहिती दिली तसेच 112 क्रमांकावर पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.






