सागर जगदाळे

भिगवण (प्रतिनिधी): पुणे-सोलापूर महामार्गावरील जुन्या पुणे-सोलापूर बायपासजवळील मानकर डोसा परिसरात वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तुकड्या-तुकड्यांत सुरू असलेले रस्त्याचे काम, जागोजागी खोदून ठेवलेले खड्डे, अपुरे सूचना फलक आणि वाहतुकीच्या नियोजनाचा अभाव यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. किरकोळ अपघाताच्या जवळपास सकाळपासून पाच ते सहा घटना झाल्याचे समोर आले आहे.
महामार्गावरील दोन्ही लेनवरील वाहने विरुद्ध दिशेने येत असल्याने वाहतुकीचा अधिकच गुंता निर्माण झाला आहे. समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देताना चालकांची मोठी तारांबळ उडत असून, ट्रक, एसटी बस, चारचाकी आणि दुचाकी एकाच अरुंद मार्गावरून मार्ग काढताना दिसत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याबरोबरच धडक होण्याचा धोकाही वाढला आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि लहान वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

दोन-तीन दिवसांपूर्वी गुणवरे वस्ती परिसरातील राधाकृष्ण हॉटेलसमोर रस्त्याच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने एक ट्रक खड्ड्यात अडकला होता. या घटनेत ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली दिसत नाही.

सणासुदीच्या सुट्ट्यांमुळे शहरातील नोकरदार वर्ग मोठ्या संख्येने गावी निघाल्याने महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. याच गर्दीत एका नवीन चारचाकी वाहनाला पाठीमागून दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याने नुकसान झाले. यामुळे प्रवाशांना आर्थिक नुकसान आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महामार्गावर काही ठिकाणी ३०० ते ५०० मीटर अंतरावर एकेरी वाहतुकीचे सूचना फलक लावले असले, तरी त्यांचा आकार अत्यंत लहान असल्याने वाहनचालकांच्या सहज नजरेस पडत नाही. अशा ठिकाणी मोठे सूचना फलक, बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर आणि वाहतूक नियंत्रित करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे.
एखाद्या मोठ्या दुर्घटनेची प्रशासन वाट पाहत आहे का?
महामार्गाचे काम करताना प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहनचालकांकडून केला जात आहे. संबंधित यंत्रणेने तातडीने पाहणी करून वाहतुकीचे योग्य नियोजन करावे. सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदारांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा सणासुदीच्या गर्दीत एखादा गंभीर अपघात होऊन निष्पाप कुटुंब उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.






