पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये रॅपिडोच्या बाइक टॅक्सी सेवेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. रिक्षा संघटनांनी या सेवेमुळे पारंपरिक चालकांच्या व्यवसायावर मोठा फटका बसत असल्याचा आरोप करत ही सेवा तातडीने बंद करण्याची आक्रमक मागणी केली आहे.

महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली विविध रिक्षा संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडे लेखी तक्रार केली होती. कोणत्याही कायदेशीर परवानग्यांशिवाय दुचाकींवरून व्यावसायिक प्रवासी वाहतूक सुरू असल्याचा दावा संघटनांनी केला. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकारी, पोलीस आणि रॅपिडो, ओला, उबेर सारख्या कंपन्यांच्या प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत रॅपिडोच्या परवानग्यांचा मुद्दा कळीचा ठरला आणि प्रशासनाने ही सेवा थांबवण्याचे निर्देश दिल्याचे संघटनांनी स्पष्ट केले.

ऑनलाइन कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे हजारो रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावले आहे, अशी खंत डॉ. बाबा कांबळे यांनी व्यक्त केली. नियम मोडणाऱ्या कंपन्यांवर केवळ तोंडी आदेश न देता त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

या बैठकीला प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, स्वप्नील भोसले, राहुल जाधव आणि वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आता प्रशासनाच्या या निर्देशांची प्रत्यक्षात कशी अंमलबजावणी होणार आणि रॅपिडोबाबत पुढे काय निर्णय घेतला जाणार, याकडे संपूर्ण वाहतूक क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.







