पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील शिल्पा गवारे यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. आता या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिल्पाच्या लग्नाच्या सुरुवातीच्या काळातील धक्कादायक माहितीही समोर आली आहे.

शिल्पा यांचा सचिन गवारे यांच्याशी २००९ मध्ये विवाह झाला होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सचिन यांच्याविरोधात गंभीर गुन्हेगारी प्रकरण असल्याची माहिती त्यांना मिळाली. मात्र, तोपर्यंत लग्न झाले होते. त्यामुळे कुटुंबाने लग्न मोडण्याऐवजी शिल्पाला सासरीच ठेवण्याचा निर्णय घेतला.

कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, सचिन आणि त्यांचा भाऊ संदीप यांच्यावर लग्नापूर्वी खुनाचा आरोप होता आणि हे प्रकरण कुटुंबीयांपासून लग्नाच्या वेळी लपवण्यात आले होते. पुढे या प्रकरणात सचिन यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि त्यांनी सुमारे चार वर्षे कारागृहात घालवल्याचा दावा करण्यात आला आहे.

शिल्पाच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, सासरच्या मंडळींकडून शिल्पाचा त्रास सुरूच राहिला. शिल्पाला त्रास देऊ नये म्हणून तिच्या माहेरच्यांनी पैशांची मागणी पूर्ण केली, व्यवसायासाठी मदत केली आणि प्लॉट खरेदीसाठीही आर्थिक सहकार्य केले. मात्र, त्यानंतरही तिचा छळ थांबला नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
शिल्पाच्या भावाने केलेल्या आरोपानुसार, तिचा पती सचिन यांना दारूचे व्यसन होते. शिल्पा घराबाहेर गेल्यानंतर तिची सासू तिच्याबाबत संशय निर्माण करून सचिन यांच्या कानावर गोष्टी घालत असे आणि त्यानंतर शिल्पाला मारहाण केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या सर्व घटनांनंतरही शिल्पाच्या आई-वडिलांनी संसार टिकावा म्हणून तिला सासरीच राहू दिले. मात्र, आता मुलीला गमावल्यानंतर हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरल्याची भावना कुटुंबीय व्यक्त करत आहेत.
दरम्यान, शिल्पाच्या मृत्यूप्रकरणी पती सचिन गवारे, सासू-सासरे आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. कुटुंबीयांनी केलेले आरोप तपासातून कितपत खरे ठरतात, हे पुढील कारवाईनंतर स्पष्ट होणार आहे.






