मुंबई : टाटा समूहाची परोपकारी संस्था ‘टाटा ट्रस्ट्स’ने देशातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी मोठी योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत देशभरात ४० ते ५० ना-नफा तत्त्वावरील सामान्य आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयांचे जाळे उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. या रुग्णालयांमध्ये पैसे देऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी संस्थेच्या २०२५-२६ च्या वार्षिक अहवालात या उपक्रमाची माहिती दिली. आरोग्यसेवा आणि संस्थात्मक क्षमता वाढवण्यावर भर देणारा २०२६ ते २०३१ या कालावधीतील पाच वर्षांचा धोरणात्मक आराखडाही त्यांनी मांडला आहे.

सामाजिक क्षेत्रात काम करताना केवळ किती निधी खर्च झाला किंवा किती लोकांपर्यंत मदत पोहोचली, यावरून कामाचे मूल्यमापन होऊ नये, अशी भूमिका नोएल टाटा यांनी मांडली. संबंधित उपक्रमांमुळे लोकांच्या जीवनात प्रत्यक्षात किती सकारात्मक बदल झाला, हे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टाटा ट्रस्ट्सच्या आगामी उपक्रमांमध्ये आरोग्यसेवेची उपलब्धता वाढवणे, सरकारी आरोग्य केंद्रे अधिक सक्षम करणे आणि कर्करोगावरील उपचार रुग्णांच्या जवळ उपलब्ध करून देणे यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
पुढील पाच वर्षांत देशातील सुमारे ७५ ब्लॉक्समधील २५ लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याचे लक्ष्य टाटा ट्रस्ट्सने ठेवले आहे. यासाठी १०० हून अधिक सरकारी आरोग्य केंद्रांचे नूतनीकरण आणि सक्षमीकरण करण्याचे नियोजन आहे.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना उपचारांसाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागू नये, यासाठी स्थानिक पातळीवरील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे प्राथमिक आरोग्यसेवेची उपलब्धता वाढण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
कर्करोगाचे निदान आणि उपचार रुग्णांना त्यांच्या घराजवळ उपलब्ध व्हावेत, यासाठी टाटा ट्रस्ट्सच्या कॅन्सर केअर नेटवर्कचा विस्तार सुरू राहणार आहे. कर्करोगाच्या उपचारांसाठी लांबचा प्रवास करावा लागणाऱ्या रुग्णांना स्थानिक पातळीवर सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे.
संस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार, संबंधित आर्थिक वर्षात कॅन्सर केअर कार्यक्रमांतर्गत १ लाख ६ हजार ६२६ रुग्णांना वैद्यकीय सल्ला देण्यात आला. तसेच २४ हजार ८७४ केमोथेरपी सायकल पूर्ण करण्यात आल्या, तर २ हजार ८७९ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
टाटा ट्रस्ट्सच्या या आराखड्यामुळे देशातील आरोग्यसेवेची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना परवडणारे उपचार मिळावेत आणि आरोग्य सुविधांमधील असमानता कमी व्हावी, यावर या उपक्रमाचा भर असेल.






