पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आता हक्काचा निवारा मिळणार आहे. या दुर्घटनेत 9 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी महापालिका प्रशासनाने पिंपरीतील यशवंतनगर येथील एसआरए प्रकल्पात मोफत सदनिका देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित विभागाला आदेश दिले आहेत.

8 जुलै 2026 रोजी मोशी येथील कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या अनधिकृत प्रशासकीय इमारतीचा भाग कोसळला होता. या दुर्घटनेत 9 कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसोबतच कायमस्वरूपी निवारा देण्याचा विषय पुढे आला होता. महापालिकेच्या सभेत 2 सप्टेंबर 2026 रोजी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
5 नोव्हेंबर 2026 रोजीच्या प्रस्तावानुसार, सध्या 8 मृत कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना सदनिका देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये राहुल गायकवाड, महेश कुंभार, अक्षय सावंत, वामन कसबे, सनी माने, सुनील कोरके, भावेश वाणी यांच्या पत्नी आणि रणजित पाटील यांच्या आईचा समावेश आहे.

दरम्यान, मृत कर्मचारी नागेश गायकवाड यांच्या वारसांची आवश्यक कागदपत्रे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबालाही सदनिका देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाने यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे. याशिवाय मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदतही देण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक साह्याबरोबरच घराच्या स्वरूपात कायमस्वरूपी आधार मिळणार असल्याने संबंधित कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.






