दौंड : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातील भोईटेनगर परिसरात घरासमोर झाडू मारणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी मंगळसूत्र दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. शनिवारी (१७ ऑक्टोबर) सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास ओम हॉस्पिटलजवळ ही घटना घडली. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिभा संजय भंगारे (वय ४९, रा. भोईटेनगर, दौंड) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या शनिवारी सकाळी घरासमोर झाडू मारत होत्या. त्यावेळी नंबर प्लेट नसलेल्या हंटर मोटारसायकलवरून दोन अनोळखी व्यक्ती तेथे आल्या. त्यांनी हिंदी भाषेत ‘यहाँ कोई संजय राऊत रहता है क्या?’ अशी विचारणा केली.

फिर्यादी यांनी संबंधित व्यक्तींना आपल्याला माहिती नसल्याचे सांगून पुढे जाऊन विचारण्यास सांगितले. त्यानंतर त्या पुन्हा घरासमोरील कामात व्यस्त झाल्या. याच संधीचा फायदा घेत दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी मंगळसूत्र हिसकावून घेतले. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले.

महिलेने आरडाओरडा केला आणि घडलेला प्रकार आपल्या मुलीला सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी दौंड पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. चोरीला गेलेल्या सोन्याच्या मिनी मंगळसूत्राची किंमत सुमारे ७० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीने पांढऱ्या रंगाचा काळ्या पट्ट्यांचा शर्ट, राखाडी पँट आणि काळे हेल्मेट घातले होते. मागे बसलेल्या व्यक्तीने निळ्या रंगाचा टी-शर्ट, गुडघ्याजवळ पांढरा पॅच असलेली निळी पँट, पांढरे बूट आणि काळी टोपी घातली होती. त्याच्या पाठीवर काळ्या रंगाची बॅग होती.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विजय पवार करीत आहेत. परिसरातील माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.






