बारामती : महाराष्ट्रातील उद्योजक आणि समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर बारामती विमानतळाजवळ जीवघेणा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बुके देण्याच्या बहाण्याने आलेल्या काही व्यक्तींनी त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याचा आणि त्यानंतर गोळीबार केल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेत सूर्यवंशी जखमी झाल्याची माहिती असून, त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यात हलवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी साडेसातच्या सुमारास बारामती विमानतळाजवळील कटफळ परिसरात हा प्रकार घडला. काही व्यक्ती बुके देण्याच्या बहाण्याने राणा सूर्यवंशी यांच्याजवळ आल्या. बुके देत असतानाच त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र, सूर्यवंशी यांनी गोळी चुकवल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

हल्ल्यानंतर राणा सूर्यवंशी यांना बारामती येथील सिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे हलवण्यात आल्याची माहिती आहे.

या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे आणि हल्ला करण्यामागील नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोरांची ओळख आणि घटनेमागील कारण याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे पुढील तपासात काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.






