मुंबई : मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर सायमाळजवळ झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रशांत रवींद्र तांडेल आणि चैत्राली तांडेल अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. अपघातानंतर दोघेही बेपत्ता असल्याने नातेवाईकांकडून त्यांचा शोध सुरू होता. अखेर दोन दिवसांनंतर खोपोली पोलिसांना त्यांचे मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २० ऑक्टोबर रोजी प्रशांत तांडेल आणि त्यांची पत्नी चैत्राली हे दोघे स्कूटरवरून एकवीरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन ते पेणच्या दिशेने परतत असताना मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील सायमाळजवळील अवघड वळणावर हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या वळणावर स्कूटरवरील नियंत्रण सुटल्याने वाहनाचा अपघात झाल्याची शक्यता आहे. मात्र, अपघात नेमका कसा घडला, याबाबतचा तपास सुरू आहे.

अपघातानंतर तांडेल दाम्पत्य घरी परतले नाही. त्यामुळे चिंताग्रस्त नातेवाईकांनी त्यांचा विविध ठिकाणी शोध घेतला. मात्र, दोघांचाही ठावठिकाणा लागत नसल्याने अखेर खोपोली पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
यानंतर खोपोली पोलिसांनी हेल्प फाउंडेशनच्या सहकार्याने शोधमोहीम सुरू केली. दाम्पत्याच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे सायमाळ ते शिंग्रोबा मंदिर परिसरात शोध घेण्यात आला.
शोधमोहीमेदरम्यान टाटा सायमाळ स्टाफ कॉलनीच्या सुरक्षा भिंतीजवळ अपघातग्रस्त स्कूटर आढळली. स्कूटर भिंतीवर अडकलेल्या अवस्थेत होती. वाहनाखाली प्रशांत तांडेल यांचा मृतदेह, तर सुरक्षा भिंतीखाली चैत्राली यांचा मृतदेह आढळून आला. दोघांच्याही डोक्याला गंभीर मार लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
खोपोली पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात पाठवले. या अपघाताची नेमकी कारणे शोधण्यासाठी खोपोली पोलीस पुढील तपास करीत आहेत.






