लोणी काळभोर, ता. ३१ : लग्नापूर्वी स्वतःला श्रीमंत असल्याचे भासवून फसवणूक केली. त्यानंतर माहेरून वारंवार पैसे आणण्यासाठी दबाव, मारहाण, शिवीगाळ कडून कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कवडीपाट टोलनाका परिसरात राहणाऱ्या एका महिलेला मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे. हि घटना उरुळी देवाची (ता. हवेली) परिसरातील मंतरवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा” फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती योगेश भरतदास वैष्णव (वय 26), सासरे भरतदास वैष्णव (वय 60), सासू मीना वैष्णव (वय 55), मोठा दिर रोहित भरतदास वैष्णव (वय 40), ननंद उषा (पुर्ण नाव माहित नाही), नंदवा चंदु (पुर्ण नाव माहित नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका ३० वर्षीय विवाहितेने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पहिल्या पतीच्या निधनानंतर २०२४ मध्ये योगेश भरतदास वैष्णव याच्याशी विवाह झाला. विवाह जुळविताना योगेशचे कुटुंब अत्यंत श्रीमंत असून त्यांचे स्वतःचे कपड्यांचे गोडाऊन, मोठा व्यवसाय आणि चांगली आर्थिक परिस्थिती असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, लग्नानंतर प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
सासू मीना वैष्णव यांनी हिंदीतच बोलण्याची सक्ती, मारवाडी साडी परिधान करण्याचा हट्ट आणि विविध कारणांवरून सतत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. नणंद उषा हिनेही वारंवार शिवीगाळ, मारहाण करून पतीचे दुसरे लग्न लावून देण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. मोठा दीर रोहित वैष्णव आणि इतर नातेवाईकांनीही मानसिक त्रास दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. पतीला व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा सातत्याने दबाव टाकण्यात आला. सुरुवातीला वडिलांकडून पैसे दिल्यानंतरही पुन्हा दोन लाख रुपये उभे करण्यासाठी त्यांच्या वडिलांनी गावाकडील जमीन गहाण ठेवून रक्कम दिली. तरीही पैशांची मागणी सुरूच राहिली.
दरम्यान, १० मे २०२६ रोजी पती योगेश वैष्णव अचानक बेपत्ता झाल्याने फुरसुंगी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. नंतर तो राजस्थानमध्ये सुरक्षित असल्याचे समोर आले. पत्नी त्रास देत असल्याने गावाकडे गेल्याचे त्याने पोलिसांना सांगून मिसिंगची नोंद रद्द करण्यात आली. मात्र, लग्नापासून मे २०२६ पर्यंत पती, सासरे भरतदास वैष्णव, सासू मीना वैष्णव, दीर रोहित वैष्णव, नणंद उषा आणि नंदवा चंदू यांनी संगनमत करून आर्थिक फायद्यासाठी सतत छळ, मारहाण, शिवीगाळ आणि धमक्या दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. या तक्रारीच्या आधारे फुरसुंगी पोलिसांनी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.






