पुणे : पुणे शहरातील वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाची खालावत चाललेली स्थिती याबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. पुणे महापालिकेने केलेल्या एका सर्वेक्षणात शहरातील पर्यावरणाबाबत अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या जवळपास निम्म्या नागरिकांनी शहरातील पर्यावरणाची अवस्था खराब किंवा अतिशय खराब असल्याचे मत नोंदवले आहे.

महापालिकेने शहरातील पर्यावरणाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी सुमारे 1,600 नागरिकांचा सहभाग असलेले सर्वेक्षण केले. त्यामध्ये 49 टक्के नागरिकांनी प्रदूषणाची पातळी चिंताजनक असल्याचे सांगितले. केवळ 9.6 टक्के नागरिकांनी शहरातील पर्यावरण चांगले किंवा अतिशय चांगले असल्याचे मत व्यक्त केले, तर 41.8 टक्के नागरिकांनी पर्यावरणाची स्थिती मध्यम असल्याचे सांगितले.

नागरिकांच्या मते, शहरात वाढणारे प्रदूषण, झपाट्याने होणारा विकास, कमी होत चाललेली झाडांची संख्या आणि वाढती वाहनांची गर्दी यामुळे पर्यावरणावर परिणाम होत आहे. त्यामुळे या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
सर्वेक्षणात पर्यावरण सुधारण्यासाठी विविध उपायांनाही नागरिकांनी पाठिंबा दिला. शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड आणि शहरी वनीकरण वाढवावे, अशी मागणी अनेकांनी केली. तसेच खासगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याची तयारीही नागरिकांनी दर्शवली.
याशिवाय प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर, पर्यावरणपूरक उपक्रम आणि आठवड्याच्या शेवटी काही प्रमुख व्यावसायिक रस्ते पादचाऱ्यांसाठी खुले ठेवण्याच्या संकल्पनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, अशा उपक्रमांसाठी आवश्यक सुविधा आणि पायाभूत व्यवस्था अद्याप पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
महापालिकेने या सर्वेक्षणातील निष्कर्षांच्या आधारे पर्यावरण सुधारण्यासाठी पुढील धोरणे आखण्याची तयारी सुरू केली आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग आणि प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.






