पुणे: जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी (२७ ऑगस्ट) पहाटे सव्वाचारच्या सुमारास भीषण अपघात झाला. कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत सुरज ढाब्यासमोर भरधाव वेगातील कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकाला जोरदार धडकली. त्यानंतर ही कार थेट रस्त्यालगतच्या ओढ्यात जाऊन कोसळली. या दुर्घटनेत कारमधील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला आहे.

हुसेन शब्बीर गोधरावाला (वय २७, रा. कोंढवा, पुणे) आणि आसीर असगरअली इनामदार (वय २६, रा. नेहरूनगर, पुणे) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. कार चालवणारा अनिकेत गौतम बरवा हा या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या वेळी अनिकेत बरवा हा कार घेऊन जात होता. कारचा वेग अधिक असल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. काही क्षणांतच कार रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकावर जोरदार आदळली आणि त्यानंतर नियंत्रणाबाहेर जाऊन शेजारील ओढ्यात कोसळली. धडक एवढी जोरदार होती की कारचे मोठे नुकसान झाले.

या अपघातात कारमधील हुसेन आणि आसीर यांना गंभीर दुखापत झाली. दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी चालकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार गोकुळ भास्कर खेडकर यांनी फिर्याद दिली आहे. निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून चालक अनिकेत बरवा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.







