अहिल्यानगर : श्रीरामपूर तालुक्यातील ब्राह्मणगाव परिसरात शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना भरधाव कारने धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. ब्राह्मणगाव जिल्हा परिषद शाळेतील 6 विद्यार्थी या अपघातात जखमी झाले आहेत. यातील एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असून, तिच्यासह तिघांना फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे.

ब्राह्मणगाव-वेताळ परिसरात हा अपघात झाला. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी परतत असताना खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षकांची कार वेगाने आली आणि रस्त्यावरील विद्यार्थ्यांना धडकली. शिक्षकांची कार परिसरातून जात असताना अचानक रस्त्यावर शेळ्यांचा मोठा कळप आल्याने चालकाचा ताबा सुटला. प्रसंगावधान हरवल्याने ब्रेक लावण्याऐवजी एक्सलेटर दाबला आणि कारचा वेग वाढला. त्यामुळे अनियंत्रित झालेल्या वाहनाने आधी शेळ्यांना धडक दिली आणि त्यानंतर रस्त्याने चालत जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर कार आदळली. या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

अपघाताची माहिती मिळताच बाजार समितीचे माजी संचालक राधाकिसन आहेर यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी कारमधील दोन्ही शिक्षकांना ताब्यात घेतले. जखमी मुलांच्या उपचाराची जबाबदारी घेण्यास त्यांना भाग पाडण्यात आल्याची माहिती आहे. गंभीर जखमी विद्यार्थिनीच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिस निरीक्षक विशाल खैरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात 6 विद्यार्थी जखमी झाले. या अपघातातील जखमी विद्यार्थ्यांमध्ये केशव आकाश बर्डे (6), आकांक्षा आकाश बर्डे (9), वैभव अमोल बर्डे (6), प्रीती अमोल बर्डे (8), प्रांजल बाळासाहेब तोरणे (7) आणि श्रद्धा बाळासाहेब तोरणे (12) यांचा समावेश आहे.







