पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. त्यांच्या दौऱ्यादरम्यान काँग्रेसने दिल्लीतील आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्याला भाजपनेही जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिल्याने शहरातील वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत अमित शहा यांच्या सुरक्षेचा आढावा, संभाव्य आंदोलने, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आणि संवेदनशील ठिकाणांवरील पोलिस बंदोबस्ताबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे.

दुसरीकडे, महापालिका प्रशासनानेही शहा यांच्या दौऱ्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यांच्या ताफ्याच्या मार्गावरील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. विमानतळापासून महर्षीनगरपर्यंतच्या मार्गावरील खड्डे बुजवून रस्ते स्वच्छ, खड्डेमुक्त आणि अतिक्रमणमुक्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शुक्रवारी रात्री अमित शहा पुण्यात दाखल होणार असल्याची माहिती असून, त्यांचा ताफा महर्षीनगर आणि स्वारगेट परिसरातून जाण्याची शक्यता आहे.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी अमित शहा सारसबाग परिसरातील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा कार्यक्रम अद्याप अंतिम नसला तरी सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने सारसबाग, स्वारगेट आणि व्होल्गा चौक परिसरातील रस्त्यांचीही दुरुस्ती करण्यात येत आहे.
शहरातील अनेक रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असताना, व्हीआयपी दौऱ्याच्या निमित्ताने प्रशासनाने तातडीने रस्ते दुरुस्तीला सुरुवात केल्याने या निर्णयावरही विविध स्तरांतून चर्चा सुरू झाली आहे.






