उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या आठ दिवसांत चार ठिकाणी चोरीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. एकाच पद्धतीचा वापर करून दुकाने फोडणाऱ्या तीन अज्ञात चोरट्यांच्या टोळीने परिसरात धुमाकूळ घातला आहे.

मेडिकल, दूध डेअरी, हार्डवेअर आणि अर्धसैनिक कॅन्टीनला लक्ष्य करत चोरट्यांनी लाखो रुपयांची रोकड व मुद्देमाल लांबवला आहे.या सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असूनही चोरटे मोकाट असल्याने “उरुळी कांचन पोलिसांची रात्रगस्त फक्त कागदावर आणि नावालाच उरली आहे का?” असा सवाल आता स्थानिक व्यापारी आणि नागरिक विचारत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास तीन चोरट्यांच्या या टोळीने लागोपाठ तीन ठिकाणी चोऱ्या केल्या, यामध्ये उरुळी कांचन येथील खेडेकर मळा परिसरातील अर्धसैनिक कॅन्टीनचे शटर उचकटून चोरट्यांनी तब्बल 19 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यानंतर चोरट्यांनी मल्हार मेडिकलमध्ये प्रवेश करून गल्ल्यातील 25 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. तर सोरतापवाडी फाट्यावरील किशोर जगताप यांचे हार्डवेअरचे दुकानही याच तीन चोरट्यांनी उचकटून आत प्रवेश केला. काय चोरीला गेले याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
मंगळवारी (ता.21) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथील नामांकित ‘चक्रधर दूध डेअरी’ मध्ये याच तीन भामट्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. गल्ल्यातील 52 हजार रुपयांची रोकड आणि दुकानातील फ्रिज उघडून त्यातील महागडे कॅडबरी चॉकलेट्स चोरून नेले होते.
सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, सर्वच घटनांमध्ये 20 ते 30 वयोगटातील तीन तरुण चोरटे स्पष्टपणे दिसून येत आहेत. एकाच छताखाली आणि एकापाठोपाठ एक दुकाने फोडण्याची त्यांची पद्धत पाहता, ही एकच सराईत टोळी उरुळी कांचन व परिसरात फिरत असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, अवघ्या आठ दिवसांत एकामागोमाग एक चार ठिकाणी झालेल्या चोऱ्यांमुळे स्थानिक दुकानदारांमध्ये घबराट पसरली आहे. रात्रीच्या वेळी पोलीस गस्त घालतात की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.”चोरटे उघडपणे फिरून दुकाने फोडत आहेत आणि पोलीस मात्र झोपेत आहेत,” अशी चर्चा उरुळी कांचन परिसरात सुरु झाली आहे.







