पुणे: पनीर आणि नॉनव्हेजला पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाणारे सोया चाप पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मात्र यावेळी त्यामागचे कारण त्याची चव नसून, ते तयार करण्याच्या कथित अस्वच्छ पद्धतीचा एक व्हिडीओ आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये काही कामगार सोया चाप तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बॅटरमध्ये लोळत रील बनवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील नोएडा येथील एका कारखान्यातील असल्याचा दावा केला जात असला, तरी त्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. दरम्यान, अन्नसुरक्षा विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

सुमारे ३७ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये कारखान्याच्या जमिनीवर सोया चापचे बॅटर सांडलेले दिसते. त्यामध्ये एक कामगार अर्धनग्न अवस्थेत लोळताना दिसतो. दुसरा कामगार त्याला ओढत असल्याचे, तर आणखी एक जण त्याच्यावर पाण्याचा फवारा मारताना दिसतो. या संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण करून सोशल मीडियासाठी रील तयार करण्यात येत असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसते. याचवेळी इतर काही कामगार कारखान्यातील यंत्रांवर नियमित काम करत असल्याचेही दिसून येते.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, अन्नपदार्थांच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशा प्रकारे अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थ तयार होत असतील तर त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या आरोग्यावर होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. याआधीही सोया चापमध्ये दुर्गंधी येणे किंवा त्यामध्ये किडे आढळल्याच्या तक्रारी वेळोवेळी समोर आल्या होत्या. त्यामुळे या प्रकारामुळे पुन्हा एकदा अन्न उत्पादनाच्या गुणवत्तेवर चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, गौतमबुद्ध नगरचे सहाय्यक अन्नसुरक्षा आयुक्त सर्वेश मिश्रा यांनी या व्हिडीओची दखल घेत चौकशी सुरू केल्याची माहिती दिली आहे. प्राथमिक तपासात हा व्हिडीओ नेमका नोएडातीलच कारखान्यातील आहे का, याची खातरजमा करण्यात येत आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे अन्नसुरक्षा विभागाने स्पष्ट केले आहे.







