पुणे: अंगणवाड्यांमधील शून्य ते तीन वर्षे वयोगटातील बालके, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या घरपोच पोषण आहार योजनेत राज्य सरकारने महत्त्वाचे बदल केले आहेत. लाभार्थ्यांना अधिक पौष्टिक, चविष्ट आणि दर्जेदार आहार मिळावा या उद्देशाने खाद्यपदार्थांच्या यादीत सुधारणा करण्यात आली असून, नवीन आहार पद्धतीची अंमलबजावणी नोव्हेंबर-डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

सुधारित योजनेनुसार आतापर्यंत दिल्या जाणाऱ्या मूगडाळ खिचडीसोबत आता व्हेज पुलाव आणि बहुधान्य पौष्टिक पफ (लाह्या) यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना अधिक वैविध्यपूर्ण आणि संतुलित आहार उपलब्ध होणार आहे. पुणे जिल्ह्यातील एक लाखांहून अधिक बालके, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना वर्षातील सुमारे ३०० दिवस या पोषण आहाराचा लाभ मिळणार आहे.

महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत यापूर्वी मूगडाळ खिचडी आणि बहुधान्य-प्रथिन मिश्रणाचा पुरवठा केला जात होता. आता मात्र आहार अधिक आकर्षक आणि स्वीकारार्ह करण्यासाठी त्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. मूगडाळ खिचडीचे प्रीमिक्स कायम ठेवण्यात आले असून, त्यासोबत स्वतंत्र मसाल्याचे पाकीट दिले जाणार आहे. तसेच प्रथमच व्हेज पुलावचा समावेश करण्यात आला असून, जुन्या बहुधान्य-प्रथिन मिश्रणाऐवजी बहुधान्य पौष्टिक पफ देण्यात येणार आहेत.
योजनेतील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे आहाराचे स्वरूप. यापुढे लाभार्थ्यांना तयार खाण्याऐवजी ‘रेडी टू कूक’ स्वरूपातील साहित्य दिले जाणार आहे. स्वतंत्र पॅकेटमध्ये उपलब्ध होणारे हे पदार्थ घरच्या घरी सहज शिजवून ताजे खाता येतील. त्यामुळे आहाराची चव, गुणवत्ता आणि पोषणमूल्य अधिक चांगल्या प्रकारे जपली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर-डिसेंबरपासून जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये सुधारित खाद्यसूचीनुसार पोषण आहाराचा पुरवठा सुरू करण्यात येणार असून, लाभार्थ्यांना अधिक पौष्टिक आणि दर्जेदार आहार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.







