पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएत सहभागी होणार असल्याच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात जोर धरला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, तर त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने या चर्चांना आणखी उधाण आले. या भेटींनंतर राष्ट्रवादी लवकरच सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी होणार असल्याचे दावे राजकीय वर्तुळात केले जात होते.

याचबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाला केंद्रात एक आणि राज्यात दोन मंत्रिपदे मिळू शकतात, अशाही चर्चा रंगल्या होत्या. काही राजकीय सूत्रांच्या हवाल्याने या घडामोडींना वेग आल्याचे बोलले जात असताना, भाजपमधील एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाल्यानंतरच एनडीएमध्ये प्रवेशाचा विचार होऊ शकतो, असेही सांगितल्याची चर्चा होती.

मात्र, या सर्व चर्चांवर स्वतः शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणतेही विलिनीकरण होणार नसल्याचे ठामपणे सांगितले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एनडीएमध्ये सहभागी होण्याबाबत विचारलेल्या प्रश्नालाही शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएसोबत जाणार नसल्याचे सांगत त्यांनी अशा सर्व चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. राजकीय भेटींवरून वेगवेगळे अर्थ काढले जात असले तरी पक्षाची भूमिका बदललेली नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, शरद पवार यांच्या नरेंद्र मोदी भेटीनंतर आणि सुप्रिया सुळे यांच्या अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी चालना मिळाली आहे. मात्र, एनडीएमध्ये प्रवेश किंवा विलिनीकरणाच्या चर्चांना शरद पवार यांनी स्पष्टपणे नकार दिल्याने या विषयावरील अनेक तर्क-वितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.






