पुणे : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र महिलांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ऑगस्ट महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याचे वितरण राज्य सरकारकडून सुरु करण्यात आले असून, पुढील 2 ते 3 दिवसांत हे पैसे टप्प्याटप्प्याने सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.

महिलांना गणेशोत्सवाच्या काळातच हा निधी मिळेल अशी अपेक्षा होती; मात्र काही तांत्रिक कारणांमुळे या वितरणास विलंब झाला. सप्टेंबर महिना संपत आला तरी निधी न मिळाल्याने महिलांमध्ये उत्सुकता होती. अखेर गुरुवारी, 24 सप्टेंबर रोजी सरकारने या हप्त्याच्या वितरणासाठी अधिकृत शासन निर्णय जारी केला आणि थकित हप्ता देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .

निधी वितरणाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी फडणवीस सरकारने सामाजिक न्याय विभागाचा 339 कोटी 14 लाख रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यास मंजुरी दिली आहे. निधी हस्तांतरित झाल्यानंतर डीबीटी प्रणालीद्वारे थेट महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे.

या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 1 कोटी 66 लाख पात्र महिलांना थेट आर्थिक लाभ मिळणार आहे. आजपासून बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून, निधी जमा झाल्याचे मेसेज महिलांच्या मोबाईलवर येणे सुरु होईल. येत्या 2 ते 3 दिवसांत सर्व पात्र महिलांच्या खात्यावर ही रक्कम पोहोचेल.






