अहिल्यानगर : अहिल्यानगर-मनमाड मार्गावर असलेल्या मातोश्री वृद्धाश्रमात आज पहाटे सहा वाजता वृद्धाश्रमात राहणाऱ्या व्यक्तीनेच इतर वृद्धावर हल्ला चढवला. या रक्तरंजित घटनेत वृद्धाश्रमाचे सुरक्षारक्षक आणि एका वृद्ध रहिवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वृद्धाश्रमात राहणाऱ्या राजू घुले नावाच्या व्यक्तीने अचानक हिंसक होत हा हल्ला केला. त्याने सुरुवातीला मुख्य दरवाजावर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकावर जीवघेणा वार केला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने आत प्रवेश करून परिसरातील इतर वृद्धांवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. यात महकाळेश्वर बाबुराव हेणे (वय 60) आणि दत्तात्रेय शंकर हारके (वय 85) यांना आपला जीव गमवावा लागला.

या घटनेत गणेश छबू घोडके (वय 60), बाळासाहेब अंबादास घाडगे (वय 67), गोरख नारायण फुंदे (वय 75), साहेबराव दगडू भवर (वय 63), लिंबराज दामोदर पिस्के (वय 80) आणि संतोष ब्रिंगल (वय 60) हे जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

हल्ल्याच्या वेळी काही वृद्धांनी प्रसंगावधान राखत शेजारील पेट्रोल पंपावर धाव घेतली आणि तेथून पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सुरुवातीला हा दरोड्याचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला जात होता, मात्र सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीनंतर राजू घुले यानेच हा प्रकार केल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच संस्थेचे अध्यक्ष विक्रम राठोड आणि संचालक छाजेड यांनी तेथे धाव घेऊन जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून दिली. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
हल्ल्याचे मुख्य कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस उपअधीक्षक शिरीष वमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून संशयिताची चौकशी सुरू आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.







