पुणे : पुण्यात 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी 52 वर्षांच्या कंत्राटी सफाई कामगाराला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. जयसिंग साठे असे या आरोपीचे नाव असून तो पुणे महापालिकेत कार्यरत आहे. हे दोघेही एकाच परिसरात राहणारे असून त्यांच्यात कोणताही कौटुंबिक संबंध नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबर रोजी रुग्णालयातील डॉक्टरांनी या प्रकरणाबाबत पोलिसांना पूर्वकल्पना दिली. 12 सप्टेंबरला हा प्रकार घडल्याचा आरोप असून मुलीला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी मुलीच्या आजीसह आईचा जबाब नोंदवला. तसेच मुलीची वैद्यकीय तपासणी करून पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी न्यायालयात आवश्यक ती अतिरिक्त कलमे जोडण्याबाबतचा अहवालही सादर करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेवरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले आहे. आरोपीला मदत करणाऱ्या त्याच्या घरातील दोन महिलांना अजूनही अटक का केली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच पोलिसांनी पीडितेच्या नातेवाइकांना धक्काबुक्की केल्याचा आरोपही त्यांनी केला.

पीडित मुलीची प्रकृती सध्या गंभीर असून, ही घटना दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा अंधारे यांनी केला आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, या प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी व्हावी आणि हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जावे, अशा प्रमुख मागण्या त्यांनी लावून धरल्या आहेत. पीडितेला पूर्ण न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे. विश्रांतवाडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत






