उरुळी कांचन: जेवण झाल्यानंतर मित्रासोबत कॅनलशेजारी वॉकिंगला गेलेल्या तरुणाला शिवीगाळ करत लोखंडी कड्याने कपाळावर मारून दुखापत केल्याची घटना घडली. उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पांढरस्थळ परिसरातील नवीन कॅनल शेजारी असलेल्या संत बाळूमामा प्लॉटिंग परिसरात शनिवारी (ता. 03) संध्याकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पांढरस्थळ येथील तरुणाविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रसाद शिवाजी वाघमोडे (वय 27, व्यवसाय नर्सरी, रा. पांढरस्थळ वस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आकाश रामचंद्र पवार (रा. पांढरस्थळ वस्ती, नवीन कॅनलशेजारी, उरुळी कांचन) असे मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याबाबत उरुळी कांचन पोलिस ठाण्यात पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद वाघमोडे हे शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जेवण केल्यानंतर मित्रासोबत घराजवळील कॅनलशेजारी असलेल्या संत बाळूमामा प्लॉटिंग परिसरात वॉकिंगसाठी गेले होते. त्यावेळी त्यांचे शेजारी राहणाऱ्या आकाश पवार याने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, पवार याने हातातील लोखंडी कड्याने प्रसाद यांच्या कपाळाच्या डाव्या बाजूस मारून दुखापत केली, अशी फिर्याद पोलिसांत देण्यात आली आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार निलेश जाधव करीत आहेत.







