पुणे : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील 5 जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. या निकालाकडे राज्यातील राजकीय पक्षांसह शिक्षक आणि पदवीधर मतदारांचे लक्ष लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अनेक ठिकाणी चुरशीची लढत झाली. काही मतदारसंघांत बंडखोर आणि अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने निकालाचे गणित बदलण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीत पुणे, मराठवाडा, नागपूर आणि अमरावतीसह विविध मतदारसंघांतील लढतींकडे विशेष लक्ष दिले जात आहे. बंडखोर उमेदवार कोणाची मते कमी करणार आणि त्याचा प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना किती फटका बसणार, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.
पुणे शिक्षक मतदारसंघात चुरस

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर, शिंदे गटाचा पाठिंबा असलेले सचिन सानप आणि अपक्ष दत्तात्रय सावंत यांच्यात लढत झाली. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मंगेश चिवटे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांना माघार घेण्यास सांगितल्यानंतर शिंदे गटाने सचिन सानप यांना पाठिंबा दिला. त्यामुळे या मतदारसंघातील निकालाकडे लक्ष लागले आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात मतांचा कोटा महत्त्वाचा
पुणे पदवीधर मतदारसंघात विजयासाठी मतांच्या कोट्याचे गणित निर्णायक ठरणार आहे .पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या स्मिता जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख-जाधव आणि शिवसेना ठाकरे गटाचे सुनील मोदी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
नागपूर आणि मराठवाड्यातही लक्षवेधी लढती
नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजीत वंजारी आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यात प्रमुख लढत आहे. शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार निलेश कराळे यांच्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण आणि ठाकरे गटाचे दिलीप घुगे यांच्यात लढत झाली. अपक्ष उमेदवारांच्या कामगिरीकडेही लक्ष असेल. आता मतमोजणीत कोण बाजी मारणार आणि कोणाला पराभवाचा सामना करावा लागणार, याचे चित्र निकालानंतर स्पष्ट होणार आहे.






