पिंपरी : घरगुती वादातून संतापलेल्या वडिलांनी आपल्या दोन मुलींना मारहाण करून जखमी केल्याची घटना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, संबंधित वडिलांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरी आल्यानंतर वडिलांनी घरात सुरू असलेल्या प्रकारावरून मुलींना जाब विचारला. यावेळी वडिलांनीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादी मुलीने शिवीगाळ करू नका, असे सांगितले. मात्र, याच गोष्टीचा राग आल्याने आरोपीने दोन्ही मुलींना मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या घटनेत आरोपीने फिर्यादी आणि तिच्या बहिणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे, तर दोघींच्या शरीरावर दाताने चावा घेऊन त्यांना जखमी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीच्या डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ आरोपीने दाताने चावा घेतल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच तिच्या बहिणीच्या डाव्या हाताच्या पंजावर आणि उजव्या पायाच्या पोटरीवर चावा घेतल्याचा आरोप आहे. घरातील वादातून घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे.

घटनेनंतर पीडित मुलीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.






