नवी दिल्ली : रशियातील सायबेरिया भागात एका प्रयोगशाळेतील महिला कर्मचाऱ्याचा गंभीर आजाराने मृत्यू झाल्यानंतर या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. शेलेखोव शहराजवळील इरकुत्स्क अँटी-प्लेग रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करणाऱ्या 28 वर्षीय डारिया शिपिलोवा यांना तीव्र निमोनियाची लक्षणे दिसल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणात प्रयोगशाळेतील एका कथित घटनेचीही चर्चा होत आहे. काही रशियन माध्यमांच्या वृत्तानुसार, सप्टेंबरच्या अखेरीस प्रयोगशाळेत नमुने हाताळताना डारिया यांच्या हातातील जिवंत जिवाणू असलेली टेस्ट ट्यूब फुटली होती. काही अहवालांमध्ये या नमुन्यात Yersinia pestis हा प्लेगला कारणीभूत ठरणारा जिवाणू असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मात्र, या दाव्याला रशियाच्या आरोग्य प्रशासनाने दुजोरा दिलेला नाही. अधिकृत यंत्रणेने डारिया यांचा मृत्यू अज्ञात कारणांमुळे झालेल्या निमोनियामुळे झाल्याचे सांगितले आहे. तसेच प्रयोगशाळेत संसर्ग पसरवणाऱ्या जिवाणूशी संबंधित कोणताही अपघात झाल्याचे प्रशासनाने नाकारले आहे.

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने काही नागरिकांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले आहे. विविध अहवालांनुसार सुमारे 197 ते 200 लोकांवर लक्ष ठेवले जात असून काही ठिकाणी क्वारंटाइनची उपाययोजनाही करण्यात आली आहे.

प्लेगच्या प्रकारांमध्ये न्यूमोनिक प्लेग हा गंभीर मानला जातो. हा श्वसनाच्या माध्यमातून पसरण्याची शक्यता असल्याने त्याबाबत विशेष काळजी घेतली जाते. मात्र, सायबेरियातील या घटनेत प्लेगचा संसर्ग झाला असल्याचे अधिकृतपणे सिद्ध झालेले नाही.
या घटनेची तुलना काहीजण 2019-20 मधील वुहानमधील कोविड-19 शी करत आहे. मात्र, सायबेरियातील प्रकरण आणि कोविड-19 लॅब-लीकच्या दाव्यांमध्ये थेट संबंध असल्याचा कोणताही अधिकृत पुरावा सध्या उपलब्ध नाही.







