अहिल्यानगर, ता. 05 : नेवासा तालुक्यातील पुनतगाव फाट्याजवळ गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात तीन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या तीन दिवसांपूर्वी घरात आलेल्या नव्या बुलेटवरून तिघे भाऊ नातेवाईकांकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने माळीचिंचोरा परिसरावर शोककळा पसरली आहे. आदित्य अंबादास आहिरे (वय 16), दीपक अंबादास आहिरे (वय -14) आणि चैतन्य अंबादास आहिरे (वय 12) अशी मृत भावांची नावे आहेत.

माळीचिंचोरा येथील अंबादास आहिरे यांनी घरगुती वापरासाठी तीन दिवसांपूर्वीच नवीन दुचाकी खरेदी केली होती. नवीन गाडी घरी आल्याने तिन्ही भावांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. मात्र, गुरुवारी रात्री याच नव्या दुचाकीवरून राहाता येथील नातेवाईकांकडे जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

नेवासा-श्रीरामपूर मार्गावरून जात असताना पुनतगाव फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघातात तिन्ही भाऊ गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिघांनाही मृत घोषित केले.

शवविच्छेदनानंतर शुक्रवारी तिन्ही भावांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील तीन भावांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने नातेवाईकांसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली. या प्रकरणी दादासाहेब मुरलीधर आहिरे यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या वाहनाचा आणि चालकाचा शोध सुरू आहे.







