पुणे : महाराष्ट्रात पावसाच्या अभावामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी आणि ग्रामीण जनता मोठ्या संकटात सापडली आहे. राज्य सरकारने काही भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला असला, तरी अनेक गरजू भाग अजूनही यातून वगळले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शेतकरी व शेतमजुरांसाठी 17 महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:

1. राज्यात वंचित राहिलेले तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावे.

2. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता, शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर एक लाख रुपये तसेच शेतमजुरांना 25 हजार रुपये अनुदान तातडीने त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात यावे.
3.दुष्काळामुळे फळबागा, केळी, ऊस व भात यांचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी.
4. ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना शासनाद्वारे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात तातडीने आदेश निर्गमित करण्यात यावेत.
5.शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची सर्व वीज बिले माफ करण्यात यावीत.
6.दुष्काळग्रस्त भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक तसेच वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची वसतिगृह फी आणि मेस फी संपूर्णपणे माफ करण्यात यावी.
7.रोजगार हमी योजनेअंतर्गत सध्याचे निकष शिथिल करून, मागेल त्या ठिकाणी तीन किलोमीटरच्या परिसरात तातडीने रोजगाराची कामे सुरू करण्यात यावीत.
8.संपूर्ण जमीन महसूल माफ करण्यात यावा.
9.कर्जमाफी झालेल्या तारखेनंतर आजतागायत ज्या शेतकऱ्यांनी शेती व शेती व्यवसायाशी निगडित घेतलेले सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी अर्बन बँका आणि पतसंस्था तसेच सामाजिक न्याय, अल्पसंख्याक, आदिवासी विभागाचे वैयक्तिक कर्ज, तसेच फळबागांसाठी घेतलेले कर्ज आणि महिला बचत गटांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम संपूर्णपणे माफ करण्यात यावी.
10.पिण्याच्या पाण्याच्यासाठी तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्यासाठी टँकर मंजूर करण्याचे अधिकार तहसिलदारांना देऊन त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी.
11. दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी व शेतमजूरांकडील पशुधनासाठी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात यावे.
12. जलसंधारणाची कामे सुरू करण्यासाठी सध्याचे निकष शिथिल करून विशेष निधी उपलब्ध करून देत ही कामे तातडीने सुरू करण्यात यावीत.
13. टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या गावांतील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज खंडित करू नये. तसेच दुष्काळग्रस्त भागात कोणत्याही प्रकारचे लोडशेडिंग करण्यात येऊ नये.
14.शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना प्रतिकुटुंब २५ किलो धान्य सरसकट मोफत देण्यात यावे.
15.दुष्काळ निवारणासाठी आवश्यक असलेला संपूर्ण निधी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे तातडीने वर्ग करण्यात यावा.
16.दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून दुष्काळी परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात यावी व आवश्यक उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यात यावेत. तसेच या अधिवेशनात झालेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करून, नुकसानग्रस्त शेतकरी व शेतमजुरांना दसरा व दिवाळीपूर्वी आवश्यक आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यांमध्ये वितरित करण्यात यावी.
17. शेतकरी अथवा शेतमजूर यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रलंबित असलेली थकीत देयके व त्यावरील अनुदान तातडीने वितरित करण्यात यावे.
जेष्ठ नेते शरद पवार यांनी वरीलप्रमाणे केलेल्या मागण्यांची शासनामार्फत तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. दुष्काळामध्ये होरपळलेल्या शेतकरी, शेतमजूर तसेच नागरिकांना तातडीने दिलासा द्यावा, ही विनंती पत्रात केली आहे.






