पुणे : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मुंबई पोलिसांनी राजस्थान पोलिस आणि अँटी गँगस्टर टास्क फोर्सच्या संयुक्त कारवाईत कोटा येथून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आता या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान आरोपींनी एक खळबळजनक माहिती दिली आहे. सुरुवातीला त्यांच्या निशाण्यावर टायगर श्रॉफ नव्हताच. ते मुंबईत एका मोठ्या व्यक्तीला संपवण्यासाठी आले होते. मात्र, ठरवलेले मुख्य टार्गेट सहज गाठता न आल्यामुळे त्यांनी टायगर श्रॉफवर हल्ला करण्याचा प्लॅन बदलला.

तसेच टायगरसोबत कोणताही पोलिस बंदोबस्त नसतो, ही बाब त्यांना चाहत्यांच्या सोशल मीडिया रील्सवरून समजली होती. इन्स्टाग्रामवरील रील आणि पोस्टच्या आधारेच आरोपींनी टायगरच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. बॉलिवूडमध्ये आपली दहशत निर्माण करण्यासाठीच त्यांनी अभिनेत्याला लक्ष्य केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. मात्र, त्यांचे मूळ टार्गेट असलेली ती दुसरी व्यक्ती कोण, याचा शोध घेणे अद्याप बाकी आहे
या संपूर्ण कटाचा सूत्रधार अनिल पंडित असल्याचे उघड झाले असून तो आरोपी रेहानच्या संपर्कात होता. विशेष म्हणजे, एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी हे आरोपी ‘सिग्नल’ या एन्क्रिप्टेड ॲपचा वापर करत होते. याआधी दिग्दर्शक रोहित शेट्टीशी जोडलेल्या एका प्रकरणातही याच ॲपच्या वापराची चर्चा रंगली होती. सध्या पोलिस या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि नेमका कट कसा रचला गेला, याचा सखोल तपास करत आहेत.

दरम्यान या प्रकरणातील घटनेनंतर आरोपी मुंबईतून पळून दिल्लीच्या दिशेने जात होते, मात्र पोलिसांनी चालत्या ट्रेनमधूनच त्यांचा माग काढून त्यांना बेड्या ठोकल्या. या गुन्ह्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याची माहिती समोर येत आहे.








