पुणे : राज्यात पावसाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या यादीत नसलेल्या तालुक्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.

यादीत नसलेल्या इतर भागांचीही पाहणी करून ‘ट्रिगर 3’ च्या नियमांनुसार योग्य ती मदत पुरवली जाईल. दुष्काळामुळे प्रभावित झालेल्या एकाही शेतकऱ्याला किंवा नागरिकाला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

कमी पावसामुळे अडचणीत आलेल्या 265 तालुक्यांमध्ये मदत म्हणून सुमारे 12 वेगवेगळ्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. पिकांच्या नुकसानीची भरपाई नियमांनुसार थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. सर्व जिल्ह्यांसाठी विशेष योजना आखण्यात आल्या असून, पिण्याच्या पाण्याला सर्वात प्रथम प्राधान्य दिले जाईल. सध्या बहुतांश धरणांमध्ये पिण्यासाठी पुरेसा पाणीसाठा आहे. पुढील जुलै आणि ऑगस्ट महिन्यांपर्यंतचे पाणी राखून ठेवून शिल्लक पाणी रब्बी पिकांसाठी सोडण्याबाबत विचार सुरू आहे.

हवामानातील ‘अल निनो’च्या प्रभावाचा सखोल अभ्यास केला जात असून, फेब्रुवारी अखेरपर्यंत परिस्थिती अधिक आव्हानात्मक होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन आधीपासूनच सर्व तातडीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. संकट काळात शासनासोबतच नागरिकांनीही सहकार्य करावे आणि अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
दुसरीकडे, गडचिरोलीतील भामरागड परिसरात छत्तीसगडमधील मुसळधार पावसामुळे पुराचे पाणी साचले होते. तेथील स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहून पुरामुळे झालेल्या नुकसानीवर सरकार पूर्ण लक्ष ठेवून आहे. सध्या पूर ओसरत असून तेथील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे.






