शिरूर: शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील राजहंस लॉजमध्ये आर्थिक फायद्यासाठी महिलेला वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी तिघांना अटक केली असून, सोमवारी (ता.१९) सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी रोख रक्कम, कंडोमची पाकिटे आणि ग्राहकांच्या नोंदी असलेले रजिस्टर पोलिसांनी जप्त केले आहे.

सरदवाडी (ता.शिरूर) येथील राजहंस लॉजमध्ये महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धडक कारवाई करून संबंधित महिलेला महिला पोलिसांच्या मदतीने सुरक्षित ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलेला वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याच्या तक्रारीवरूनच पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

याप्रकरणी अनिल किसन डांगे (वय ४२, रा.इंदिरानगर-शिरूर, ता.शिरूर, जि.पुणे) व सचिन महादेव जाधव (वय ३७, रा. राजहंस लॉज-सरदवाडी, ता.शिरूर, जि.पुणे) आणि पिंटू दोरगे (पूर्ण नाव माहीत नाही, रा. सरदवाडी, ता.शिरूर, जि.पुणे) या तिघांना शिरूर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

तसेच शिरूर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.






