पुणे : गुलटेकडी येथील मार्केट यार्ड परिसरात वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पोटदुखीचा तीव्र त्रास होत असल्याने संबंधित व्यक्तीने परिसरातील आरोग्य शिबिरात तपासणी करून घेतली होती. यावेळी डॉक्टरांनी त्यांना तातडीने मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधण्यात आला. मात्र, रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने उपचार मिळण्यापूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मार्केट यार्डमधील आपत्कालीन वैद्यकीय सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुलटेकडी मार्केट यार्डातील जय शारदा गजानन मंदिरासमोर एका व्यक्तीला अचानक पोटदुखीचा तीव्र त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी जवळच सुरू असलेल्या आरोग्य शिबिरात जाऊन तपासणी केली. संबंधित व्यक्तीची प्रकृती लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यास सांगितले. यासाठी रुग्णवाहिका बोलावण्यात आली. मात्र, आपत्कालीन परिस्थितीतही रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली नाही. रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचेपर्यंत संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णवाहिका उशिरा पोहोचण्यामागे नेमके काय कारण होते, याबाबत अधिकृत तपशील स्पष्ट झालेला नाही.

या घटनेनंतर बाजार समिती प्रशासनाने दखल घेतली आहे. फळे व तरकारी विभागाचे प्रमुख नितीन चौरे यांनी घटनेचा सविस्तर अहवाल तयार करून तो सचिव आणि सभापतींकडे सादर केला आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी मार्केट यार्ड प्रशासनाकडे स्वतंत्र रुग्णवाहिका असणे आवश्यक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. बाजारात दररोज मोठ्या संख्येने व्यापारी, कामगार आणि नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत मिळणे महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र रुग्णवाहिकेबाबत संचालक मंडळ सकारात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले आहे.








