मुंबई : नवरात्रोत्सवाचा आनंद आणि दांडियाचा जल्लोष सुरू असताना मीरा रोडवरून एक अत्यंत मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. गरबा खेळत असताना अचानक आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मीत रुपडा असे या मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मीरा रोड येथील ‘लोटस नवरात्रोत्सवात’ सहभागी होण्यासाठी मीत रुपडा गेला होता. रविवारी रात्री साधारण साडेअकराच्या सुमारास तो अत्यंत उत्साहात गरबा आणि दांडियाचा आनंद घेत होता. खेळताना अचानक त्याच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या आणि तो जागेवरच खाली कोसळला. त्याच्या अशा अचानक खाली कोसळण्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.

तरुणाला जमिनीवर कोसळताना पाहताच उपस्थितांनी कोणतीही वेळ न घालवता त्वरित धाव घेतली. त्याला तातडीने उपचारासाठी भाईंदर येथील ‘तुंगा रुग्णालयात’ नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या दुर्दैवी प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुणाचा मृत्यू तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानेच झाल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनलकर यांनी दिली.
अवघ्या 30 वर्षांच्या तरुण मुलाचा अशा प्रकारे अचानक जीव गेल्यामुळे त्याच्या कुटुंबियांवर आणि आप्तेष्टांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हसतखेळत खेळणारा तरुण अचानक असा निघून गेल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सणाच्या आनंदात एका तरुणाचा असा अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.






