उत्तरप्रदेश : रेस्टॉरंट व्यावसायिक शिवा शर्मा यांच्या हत्या प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी, मॉडेल श्रद्धा दुबे हिला अखेर नागपूरमधून अटक करण्यात आली आहे. गेल्या 11 दिवसांपासून ती पोलिसांना गुपचूप चकमा देत फरार होती आणि तिने नेपाळला पळून जाण्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र, पोलिसांच्या विशेष पथकाने योग्य वेळी सापळा रचून तिला आणि तिच्या दोन सहकाऱ्यांना ताब्यात घेतले.

9 ऑक्टोबर 2026 रोजी हजरतगंज भागातील अवध ग्रीन अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून पडून शिवा शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात मानला जात होता, परंतु शिवाच्या कुटुंबियांनी हा घातपात असल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली. शिवा गेल्या काही महिन्यांपासून मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर श्रद्धा दुबे हिच्यासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होता. शिवाच्या आईने केलेल्या खळबळजनक आरोपानुसार, श्रद्धा आणि तिच्या साथीदारांनी आधी शिवाला बेदम मारहाण केली आणि नंतर त्याला गच्चीवरून किंवा चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिले.

तपासात असेही समोर आले की, आरोपी श्रद्धा आणि तिचे सहकारी शिवाला त्याचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होते. या ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून त्याच्याकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केली जात होती तसेच त्याच्या रेस्टॉरंट व्यवसायावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू होता. या गंभीर आरोपानंतर लखनऊ पोलिसांनी श्रद्धासह तिची बहीण रश्मी आणि दानिश यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र करत फरारी आरोपीवर 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. अखेर गुप्त माहितीच्या आधारे उत्तर प्रदेश एसटीएफ, लखनऊ कमिश्नरेट आणि नाशिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईने नागपूरमधील एका हॉटेलमधून श्रद्धा, रश्मी आणि दानिश यांना बेड्या ठोकल्या. सध्या पोलीस या तिघांची कसून चौकशी करत असून या हत्येमागील इतर बळींचा शोध घेतला जात आहे.






