पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्याने लढा देणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.जरांगे यांच्यावर त्यांच्याच आंदोलनात सक्रिय असलेल्या ललिता तारख या महिलेने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. यामुळे मराठा आंदोलनात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करत असताना त्यांनी अचानक आपले उपोषण स्थगित केले आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत दिली. या निर्णयानंतर त्यांचे मुख्य केंद्र असलेल्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.अंतरवाली सराटी येथील उपोषणाचा मंडप आणि व्यासपीठ ग्रामस्थ व सरपंचांनी हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एकीकडे आंदोलन स्थळावरील ही व्यवस्था हटवली जात असताना, दुसरीकडे
ललिता तारख यांनी आरोप केले आहेत.

ललिता तारख यांनी थेट टीका करत म्हटले की, जरांगे यांनी महिलांना भावनिक साद घालून त्यांचा केवळ आंदोलनासाठी वापर केला. गावातील नागरिकांना खोटी आश्वासने देऊन त्यांची दिशाभूल करण्यात आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या आधारे आरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात 10 महिने आधी अर्ज करूनही अंतरवाली सराटीमध्ये एकही कुणबी नोंद किंवा प्रमाणपत्र मिळालेले नाही.

त्यांनी जरांगे यांच्या उपोषणाच्या पद्धतीवरही थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. “मी स्वतः त्यांच्या चौथ्या उपोषणाची साक्षीदार होते आणि मीच त्यांचे उपोषण सोडवले होते. एखादी व्यक्ती उपोषण करताना इतके दिवस कशी राहू शकते, याचे वास्तव मी योग्य वेळ आल्यावर उघड करेन,” असा इशारा तारख यांनी दिला.
याशिवाय, आंदोलन स्थळावरून इतरांना शिवीगाळ करणे किंवा जिल्हाधिकाऱ्यांसारख्या प्रशासकीय अधिकाऱ्यांबद्दल अपशब्द वापरणे अत्यंत अयोग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व 18 पगड जातींना सोबत घेऊन काम केले होते, असा दाखला देत त्यांनी जरांगे यांच्या भाषेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे..त्यामुळं आता नव्या वादाला तोंड फुटले आहे







