यवत, ता. २८ : खुटबाव (ता. दौंड) परिसरात २७ जुलै रोजी मध्यरात्री गावातील घरांवर सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण आणि यवत पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला. आरोपींकडून कोयते, लोखंडी गज, मिरची पावडर आणि दोरीसारखे दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजित मुकेश राठोड (५०), मच्छिंद्र पोपट उर्फ काकाभाऊ राठोड (३५, दोघे रा. कुसेगाव, ता. दौंड), साम्यवेद मनिलाल उर्फ संजित राजपुत (२८), दीपेश करणसिंग मनावत (२९, रा. मावळ) यांना अटक करण्यात आली आहे. तर एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार विकास दशरथ कापरे यांनी सरकारच्या वतीने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुटबाव येथील साळोबावस्ती परिसरात खुटबाव-भांडगाव व खुटबाव-यवत रस्त्यावरील वाय पॉईंटजवळ झाडाझुडपात काही इसम घातक हत्यारे घेऊन दरोड्याच्या तयारीत थांबले आहेत. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर व यवत पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने संयुक्त पथक तयार करण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राऊत, वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण गाडेकर, सहाय्यक फौजदार सचिन घाडगे, असिफ शेख तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पंचांसह घटनास्थळी सापळा रचला. पोलिसांनी अचानक छापा टाकताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून पाचही जणांना शिताफीने ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अजित राठोड, मच्छिंद्र राठोड, साम्यवेद राजपुत, दीपेश मनावत तसेच एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
पोलिसांनी आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून दोन धारदार कोयते, एक लोखंडी गज, मिरची पावडरचे फोडलेले पाकीट आणि १७ फूट लांबीची सुती दोरी जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपींनी खुटबाव गावातील घरांवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तेथे जमल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
दरम्यान, या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१० (४) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलिसांनी वेळेवर केलेल्या या कारवाईमुळे संभाव्य दरोड्याचा गंभीर कट उधळून लावण्यात यश आले असून, खुटबाव परिसरातील नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.







