पुणे: पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात घरफोडीची आणखी एक घटना समोर आली असून, चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून तब्बल ९ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी ७३ वर्षीय डॉक्टरांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टर आपल्या कुटुंबासह मॉडेल कॉलनीतील लकाकी रस्त्यावरील एका सोसायटीत राहतात. काही दिवसांसाठी ते कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटातील डिजिटल लॉकर फोडून त्यामध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.

घरमालक परत आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक अमर काळंगे यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांनी सोसायटी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत. दरम्यान, शहरात बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट वाढत असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच बिबवेवाडी परिसरातही अशाच प्रकारे घरफोडी करून सुमारे १९ लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्यामुळे नागरिकांनी घर बंद ठेवून बाहेर जाताना अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.






