अक्षय टेमगिरे

पुणे: शिक्रापूर येथील करंजेनगर परिसरात मोकळ्या मैदानातील झुडपात पोत्यामध्ये आढळलेल्या अज्ञात तरुणाच्या मृतदेहाचे गूढ शिक्रापूर पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही तासांत उलगडले आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटनेच आपल्या मित्राचा गळा दाबून खून केल्याचे तर आरोपीच्या पत्नीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ते २६ जुलैदरम्यान गौरव उर्फ अक्षय अशोक वायकर वय २४ वर्ष मूळ रा. थेऊर, ता. हवेली याचा खून करण्यात आला होता. २६ जुलै रोजी दुपारी करंजेनगर येथील मोकळ्या मैदानातील झुडपात एका पोत्यामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. मृताची ओळख पटत नसल्याने शिक्रापूर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. सोशल मीडियाच्या माध्यमातून मृताचे छायाचित्र प्रसारित करण्यात आले तसेच गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय करण्यात आले होते. त्यानंतर मृताची ओळख गौरव उर्फ अक्षय वायकर अशी पटली आहे.
तपासादरम्यान गौरव हा करंजेनगर येथे मुकेश विठ्ठल सोनवणे वय १९ आणि त्याची पत्नी जान्हवी अनिल पाटोळे वय १९ यांच्यासोबत राहत असल्याची माहिती समोर आली. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली.
चौकशीत मुकेश सोनवणे याने अनैतिक संबंधाच्या संशयातून गौरवचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली असून त्यानंतर पत्नी जान्हवीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून करंजेनगर येथील निर्जन झुडपात टाकल्याचेही तपासात उघड झाले आहे.
याप्रकरणी मयताची आई कांचन अशोक वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुकेश विठ्ठल सोनवणे व जान्हवी अनिल पाटोळे या दोघांना अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि शिक्रापूर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला असून
सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, हनुमंतराव गिरी, राहुल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, तुषार भोर तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अत्यंत वेगवान तपास करून आरोपींना जेरबंद केले आहे.
या कारवाईत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, हनुमंतराव गिरी, राहुल देशमुख, पोउपनि उमाकांत कुंजीर, तुषार भोर, अंकुश कारंडे, ग्रेड पोसई जितेंद्र पानसरे, पोहवा संदीप इथापे, रोहीदास पारखे, अमोल दांडगे, चंद्रकांत काळे, संदीप करांडे, पोअ संतोष बाबर, नारायण वाळके, मच्छिंद्र निचीत, ललित चकनारायण, राहुल गडदे, भारत भोसले तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोसई महेश डोंगरे, पोहवा तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, विकास पाटील आणि पोअ सागर धुमाळ यांनी सहभाग घेतला. तसेच शिक्रापूर येथील आपदा टीमचे शेरखान शेख यांनीही तपासात मोलाची मदत केली असून.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर हे करीत आहेत






