पुणे: पुण्यातील ससून रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली असून, वडिलांवर उपचार सुरू असताना डॉक्टरांवरच मुलाने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने वडिलांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टर त्यांना सीपीआर देऊन प्राण वाचविण्याचा प्रयत्न करत असतानाच मुलाने मोबाईलवर संपूर्ण उपचाराचे चित्रीकरण सुरू केले. डॉक्टरांनी रुग्णालयातील नियमांनुसार चित्रीकरण करण्यास मनाई केली. याच कारणावरून संतप्त झालेल्या मुलाने उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी हुज्जत घालत त्यांच्यावर थेट हल्ला केला.

या प्रकरणी डॉ. वृशक शिवहार चिंचोलकर (वय २६, रा. ससून क्वार्टर्स, सोमवार पेठ) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धनराज कृष्णा पिल्ले (वय ३०, रा. घोरपडी) याच्याविरुद्ध वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था अधिनियमासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ जुलै रोजी सकाळी सुमारे पावणेअकराच्या सुमारास ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ४० मध्ये घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनराज पिल्ले यांच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात आणण्यात आले होते. डॉक्टरांकडून सीपीआर सुरू असताना धनराज मोबाईलवर व्हिडिओ शूट करत होता. डॉक्टरांनी त्याला चित्रीकरण थांबवण्यास सांगितले असता, “हे माझे वडील आहेत, मी व्हिडिओ का काढू नये?” असा प्रश्न त्याने उपस्थित केला. मात्र, रुग्णालयात चित्रीकरणास परवानगी नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानंतर तो संतापला.
संतापाच्या भरात धनराज पिल्ले याने डॉक्टरांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धाव घेतली. उपचारात अडथळा निर्माण करत त्याने डॉक्टरांच्या डोक्यात हाताने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या गोंधळानंतर काही वेळातच धनराज यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. घटनेनंतर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असून, पोलीस उपनिरीक्षक वानखडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.






