उरुळी कांचन, (पुणे) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC) मर्यादित, पुणे या बँकेच्या आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र बापू कांचन यांनी निवडणूक लढवावी असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव कांचन यांनी केले. येथील ‘डॉ. मणिभाई देसाई नागरी सहकारी पतसंस्थेची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मणिश्रीकृष्ण सहकार संकुल सभागृहात पार पडली. यावेळी महादेव कांचन बोलत होते.

या वेळी माजी सरपंच ज्ञानोबा (माऊली) कांचन, संतोष कांचन, कोंडीराम (भाऊ) चौधरी, पतसंस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी, संचालक शरद वनारसे, भाऊसाहेब कांचन, कांतीलाल चौधरी, संजय कांचन, खेमचंद पुरुसवाणी, संजय टिळेकर, ह.भ.प. जीवन शिंदे, धनसिंग पोंदकुले, अनिकेत कांचन, सौ. सारिका काळभोर, सौ. कमल कांचन आणि तज्ज्ञ संचालक प्रवीण दरेकर उपस्थित होते.

संस्थेच्या उल्लेखनीय आर्थिक कामगिरीचा लेखाजोखा मांडताना अध्यक्ष राजेंद्र कांचन म्हणाले, “पारदर्शक कारभार, सामाजिक बांधिलकी आणि सभासदांचा दृढ विश्वास या त्रिसूत्रीच्या जोरावर पतसंस्थेने प्रगतीचा चढता आलेख कायम ठेवला आहे. संस्थेचा एकूण संमिश्र व्यवसाय तब्बल 641 कोटी 60 लाख रुपयांवर पोहोचला असून, यंदा सर्व 21 हजार 736 सभासदांना 15 टक्के दराने लाभांश वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

तसेच 31 मार्च अखेर संस्थेच्या ठेवी 312 कोटी 15 लाखांवरून वाढून 362 कोटी 24 लाखांवर पोहोचल्या आहेत. संस्थेने 279 कोटी 36 लाख रुपयांचे कर्जवाटप केले असून, गुंतवणूक 127 कोटी 4 लाख रुपये इतकी आहे. संस्थेला या आर्थिक वर्षात 7 कोटी 11 लाख रुपये ढोबळ नफा आणि 5 कोटी 54 लाख रुपये निव्वळ नफा झाला आहे. या आर्थिक यशामुळे सभासदांना एकूण 2 कोटी 9 लाख रुपयांचे लाभांश वाटप केले जाणार आहे.
दरम्यान, वार्षिक अहवालाचे वाचन मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण वाल्हेकर यांनी केले, तर ज्ञानेश्वर कौले, सुनील जगताप, अशोक टिळेकर, अमीन शेख, एल. बी. म्हस्के आणि गणेश चव्हाण या सभासदांनी मनोगत व्यक्त केले. सभेचे आभार उपाध्यक्ष रामदास चौधरी यांनी मानले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ‘राजेंद्र कांचन’ यांच्या उमेदवारीचा ठराव
या सभेदरम्यान पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे या बँकेच्या आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र बापू कांचन यांनी निवडणूक लढवावी, असा ठराव पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव कांचन यांनी मांडला. यावेळी उरुळी कांचन गाव आणि पतसंस्थेचे सर्व सभासद खंबीरपणे बापूंच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या ठरावाला उरुळी कांचनचे माजी सरपंच संतोष कांचन यांनी जोरदार अनुमोदन दिले.






