उरुळी कांचन, ता. 15 : पुणे जिल्ह्यात ध्वनीप्रदूषणावर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले असतानाच उरुळी कांचनमध्ये गणेश आगमन मिरवणुकीत 10 ते 12 मोठे डीजेचा दणदणाट झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कर्णकर्कश आवाजाने परिसर दणाणून गेला असतानाही पोलिसांकडून ठोस कारवाई झाल्याचे दिसून न आल्याने, “एसपींच्या आदेशाचे काय झाले? डीजेचा आवाज पोलिसांना ऐकू आला नाही का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

उरुळी कांचनसह परिसरात लाडक्या गणरायाचे मंगळवारी (ता. 15) मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. काही मंडळांनी ढोल-ताशा आणि पारंपरिक वाद्यांना पसंती दिली. मात्र, काही मंडळांच्या मिरवणुकीत मोठ्या क्षमतेचे डीजे वाजवण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. डीजेसमोर कार्यकर्त्यांनी मोठ्या आवाजात नृत्य केल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या आवाजाचा त्रास सहन करावा लागल्याच्या तक्रारी आहेत.
एसपींचा इशारा हवेतच?
जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी डीजेचा आवाज मर्यादेपेक्षा वाढवल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचा स्पष्ट इशारा दिला होता. प्रत्येक डीजेची ध्वनीपातळी तपासून नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, उरुळी कांचनमध्ये मोठ्या आवाजात डीजे वाजत असल्याचा आरोप असतानाही कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पाटसला कारवाई, उरुळीत का नाही?
याचदरम्यान पाटस (ता. दौंड) येथे विनापरवानगी मोठ्या आवाजात डीजे वाजवणाऱ्या तिघांवर यवत पोलिसांनी गुन्हा दाखल करून डीजे सिस्टीमसह वाहन जप्त केले. त्यामुळे पाटस येथे नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई होत असेल, तर उरुळी कांचनमध्ये कारवाई का झाली नाही? अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
पोलिसांची ‘बघ्याची भूमिका’
ध्वनीप्रदूषणाच्या नियमांनुसार विविध क्षेत्रांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित आहे. रुग्णालये, शाळा आणि न्यायालय परिसरासह शांतता क्षेत्रात अधिक कडक निर्बंध आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना उरुळी कांचनमध्ये पोलिसांनी ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ अशी भूमिका घेतल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. कर्णकर्कश आवाजाचा सर्वाधिक त्रास लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि रुग्णांना होतो. त्यामुळे गणेशोत्सवाचा उत्साह साजरा करताना इतरांच्या आरोग्याची किंमत मोजून जल्लोष नको, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
दणदणाटाला चाप कधी?
उरुळी कांचनमध्ये वाजलेल्या डीजेंची ध्वनीपातळी पोलिसांनी मोजली का? नियमभंग आढळला का? आढळला असल्यास कारवाई का झाली नाही? याचा खुलासा पोलिस प्रशासनाने करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ध्वनीमर्यादेचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांनी 112 क्रमांकावर तक्रार करावी, असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आता उरुळी कांचनमधील डीजेच्या दणदणाटावर पोलिस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
याबाबत बोलताना उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार म्हणाल्या, “डीजेला बंदी नाही डीजेच्या आवाजाला बंदी आहे. याबाबत कोणाचीही पोलीस ठाण्याला तक्रार आली नाही. आवाजाची तीव्रता मोजण्यात आली होती. स्वतः परिसरात फिरून पाहणी केली होती. डीजे वाजला मात्र आवाज कमी होता.







