Pune News : पुणे : शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी रूफ टॉप हॉटेलचे पेव फुटले आहे. पिंपरीतील ६ रूफ टॉप हॉटेल्सवर चार दिवसांत महापालिका प्रशासनाने कारवाई केली. रूफ टॉप हॉटेलचे वाढते पेव पाहता, कारवाईसाठी महापालिकांचे अधिकारी, पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क अधिकार्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
दोन महिन्यांत आराखडा तयार करण्यात येणार
पालकमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीमध्ये पवार यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यानुसार मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात समिती स्थापनेबाबत व पुढील कार्यवाहीसाठी बैठक होणार असल्याची माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
शहरातील अनेक इमारती, टेरेसवर रूफ टॉप हॉटेल्स आहेत. यापैकी बऱ्याच ठिकाणी रुफटॉपवरील हॉटेल्सही बेकायदा असल्याचे समोर आले आहे. मागील काही वर्षांत सातत्याने रुफटॉप हॉटेलवर आगीच्या तसेच अन्य घटना घडत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामधील हॉटेल्सचे प्रमाण जास्त आहे. या बाबी विचारात घेऊन, समिती स्थापनेचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महापालिकेने गेल्या काही महिन्यांत शहरातील ७२ हून अधिक रूफ टॉप हॉटेल्सवर कारवाई केली आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी देखील बेकायदा रुफटॉप हॅाटेल्सबाबत कडक पावले उचलण्याचे आदेश दिल्याचे विक्रम कुमार यांनी नमूद केले.
खडकवासला धरण क्षेत्रात जवळपास २४ गावे आहेत. तसेच १०० हून अधिक रिसॉर्ट व रेस्टॉरंट आहेत. या गावांचा विकास होत असताना बांधकामेही वाढत आहेत. येथे सांडपाणी वाहून नेण्याची तसेच त्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था नसल्याने सांडपाणी खडकवासला धरणात येत आहे. यामुळे पाणी प्रदूषण वाढले आहे. भविष्यात आरोग्याच्या दृष्टीने मोठी समस्या निर्माण होणार आहे.
या पार्श्वभूमीवर पीएमआरडीएने या गावांच्या सांडपाणी व्यवस्थापनाचा विकास आराखडा तयार करावा. नियमांचे उल्लंघन करणार्या रिसॉर्टवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत दिले आहेत. त्यानुसार ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून पुढील दोन महिन्यांत आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.